आर्थिक व्यवस्थापन, काळाची गरज

भारतीय महिला पैशाच्या व्यवस्थापनात म्हणजेच मनी मॅनेजमेंटमध्ये तरबेज असतात. भारतातील बहुतेक महिला अशा आहेत की त्या नोकरी न करता आपले घर अगदी व्यवस्थित सांभाळतात. शहर असो वा ग्रामीण भाग, तिथे वावरणारी प्रत्येक महिला आपला घरेलू व्यवहार पिढय़ान्पिढय़ा चालवत आहेत. घरगुती खर्चासाठी तिला देण्यात आलेल्या पैशातून हुशारीने काही पैसे वाचवत मागे टाकण्याचे काम महिला करतात. हे ज्ञान भारतीय महिलेला उपजतच असते. म्हणूनच पैशाच्या व्यवस्थापनात आपण काळजी घेणे आवश्यक आहे.

भारतात १० ते १५ टक्के महिला या कामासाठी बाहेर पडतात, याचाच अर्थ गृहिणींची संख्या नक्कीच या तुलनेत जास्त आहे. अशा परिस्थितीत गृहिणी असल्याने मनी मॅनेजमेंट हे साहजिकच पुरुषाकडे जाते, पण जर घर चालवायचे असेल तर पैशाची जबाबदारी ही दोघांकडे समान पात्रतेत असावी अशी मानसिकता आता वाढत चालली आहे. तेव्हा दोघांनीही नियोजन केल्यास त्या पैशातून आपण बचतदेखील करू शकतो.

फसव्या जाहिरातींमुळे आर्थिक नियोजन बिघडणे या संकटाला अनेक वेळा सामोरे जावे लागते. त्यामुळे हे आर्थिक नियोजन बिघडू शकते. त्याकडे लक्ष दिले तर आपण आपले नियोजन नीट करू शकतो. ही गोष्ट महिलांच्या बाबतीत हमखास घडते. घरात उपयुक्त नसलेली गोष्ट फक्त डिस्काउंट किंवा ऑफरच्या मोहापायी खरेदी केली जाते. अमुक वस्तू स्वस्तात मिळाली हे ठामपणे सांगताना महिला दिसतात. पण या नको असलेल्या गोष्टी खरेदी करून आपण ठरवलेल्या महिन्याच्या बजेटला मात्र धक्का बसतो. बचत करण्यासाठी अतिरिक्त खर्च टाळणे सर्वात महत्त्वाचे आहे. तरच आपण मनी मॅनेजमेंट करण्यात यशस्वी ठरू.

घरखर्चासाठी आपण महिन्यांमध्ये किती पैसे खर्च करावे व त्यातून आपण किती पैशांची बचत करावी याचे मॅनेजमेंट प्रत्येक गृहिणीनेच करावे. मात्र ब-याचदा काही गृहिणी कोणत्या न कोणत्या कारणामुळे या पैशाचे मॅनेजमेंट करण्यात अयशस्वी होतात. आपण जर संपूर्ण वेळ घर सांभाळत असाल तर घरात येणारी अकाली संकटे उदा. कोणी अचानक आजारी पडले अथवा आपल्या घराच्या कामासाठी पैशाची गरज लागली तर ऐन वेळी आपल्याकडे पैसे असायला हवेत, यासाठी गृहिणीने पैशाचे योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे. ज्याप्रकारे आपण बिलांचे पैसे, कामवालीचे पैसे बाजूला काढतो, त्याचप्रमाणे दर महिन्याला हातचे पैसे राहण्यासाठी देखील काही रक्कम बाजूला ठेवल्यास गरजेच्या वेळेस ती उपयोगी पडते.

भारतीय लोकांना वित्तीय व्यवस्थापनाचे ज्ञान आपल्या घरातूनच मिळत आलेले आहे. आजचे युग हे डिजिटल झाले असल्याने तरुणवर्ग आपले फायनान्शियल प्लॅनिंग डिजिटली करताना दिसतात. गृहिणींनासुद्धा हे ज्ञान मिळणे गरजेचे आहे. वित्तीय नियोजन कसे करावे याबाबत सांगणारे किंवा सोशल मीडियावर अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. तसेच याची माहिती देणारे टेलिव्हिजन शोदेखील सहसा दुपारी टेलिकास्ट देतात. सास-बहूच्या सिरियल्सऐवजी अशा प्रकारचे शो पाहिल्यास आपल्यालाच याचा फायदा नक्कीत होईल.

अनेकवेळा आपल्याला संपूर्ण माहिती असल्याच्या भ्रमात महिला असतात. मात्र प्रत्यक्षात करायची वेळ आल्यावर त्यांना त्याचे गांभीर्य कळते. परंतु ही गोष्ट आपण सकारात्मक दृष्टीने घ्यावी. एखाद्या गोष्टीबद्दल माहीत नसणे ही नैसर्गिक गोष्ट आहे, याचा स्वीकार करावा आणि तेवढय़ाच सकारात्मक दृष्टिकोनातून त्या गोष्टीची माहिती घ्यावी. बहुतेकदा महिला त्यांच्या यादी बनवण्याच्या टेक्निक मुळे फसतात. नेहमीच आपण महिन्याभरात किती खर्च केला याचीच यादी बनवली जाते. पण असे न करता आपण महिन्याभरात किती खर्च आहे त्याप्रमाणे आखणी करून त्यातून आपण किती बचत करू शकतो याची यादी बनवली पाहिजे. तरच आपले मनी मॅनेजमेंट पक्के होऊ शकते. काम करणा-या महिला आपल्या कामाचे पैसे हे स्वत:पुरते खर्च न करता आपल्या घरात राहणा-या वृद्ध किंवा आजारी लोकांसाठीही किंवा गरजेच्या वस्तूंसाठी वापरले जावे. जरी आपण फायनान्शियली स्वतंत्र असलेली महिला असे म्हणत असू तरीही घरातील पुरुषांप्रमाणेच महिलेनीही अशी जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी.

कित्येकदा असे होते की, शिकलेली महिलासुद्धा तिच्या नियोजनात गफलत करते. आपल्याला काही वित्तीय नियोजनाची गरज नाही, महिन्याला आपले सर्व छान सुरू आहे असे महिलांना वाटत असते, पण घर आणि बाकी जबाबदा-या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वित्तीय नियोजन केल्यास त्याचा फायदा भविष्यात होऊ शकतो ही दूरदृष्टी लक्षात घेतली पाहिजे. आजच्या धावपळीच्या आणि महागाईच्या जीवनात पैशाचा योग्य तो वापर करणे गरजेचे आहे. पुरुषप्रधान संस्कृती जरी असली तरी घराचा संपूर्ण भार हा आजही एक स्त्रीच उचलते. एकविसाव्या शतकातील महिला चूल आणि मूल या संकल्पनेबाहेर गेलेल्या दिसत आहेत आणि खास त्या महिलांसाठी पैशांचे मॅनेजमेंट करणे हे खूप महत्त्वाचे आहे.

G 50 , Ecstasy Business Park,
near City Of Joy, JSD Road,
Mulund West, Mumbai-400080