व्यवस्थापन खर्चाचे

ज्या लोकांना असे वाटते, की त्यांचे उत्पन्न खूप कमी आहे किंवा त्यांना पैसे वाचवणे व गुंतवणे शक्य नाही, त्यांनी आपला प्राधान्यक्रम बदलून त्याचे फायदे अनुभवावेत. एकदा फायदा होत असल्याचे काही महिन्यांनी लक्षात आले, की आपोआप हा प्राधान्यक्रम पाळण्याकडे कल वाढेल.

सहसा स्त्री ही घरातील सर्व खर्चाचे व्यवस्थापन करत असते. हे करत असताना अनेक गोष्टी सांभाळाव्या लागतात. काही खर्च अचानक संभवतात, काही खर्च माहीत असतात; पण ते मासिक नसून तिमाही, वार्षिक असतात. उदाहरणार्थ शाळेचे शुल्क, गाडीच्या विम्याचा हप्ता, मालमत्ता कर, आयकर असे अनेक खर्च हे वार्षिक, सहामाही किंवा तिमाही करावे लागतात. या अशा माहीत असलेल्या; पण नियमित न येणाऱ्या खर्चाचे व्यवस्थापन कसे करता येईल, हे आपण आज पाहू. शिवाय नियमित खर्चाचे व्यवस्थापन ही योग्य प्रकारे कसे करता येईल, हे आपण पाहू.

खर्च करताना काही गोष्टी पाळणे अतिशय महत्त्वाचे असते. दुर्दैवाने खर्चाला काहीच मर्यादा नाहीत. कितीही मोठी रक्कम हातात असली, तरी ती खर्च करणे सहज शक्य आहे. खर्च करायला प्रलोभने भरपूर आहेत. एक तर तुम्ही अनेक गोष्टी विकत घेऊ शकता किंवा महागाची एखादी गोष्ट घेऊ शकता. हल्ली आपण पाहतो, की विविध उत्पादनांनी बाजार भरलेला असतो. शिवाय मान्य करा न करा, अजून एक दुर्दैव असे, की उत्पन्नाला मर्यादा आहे. जरी एखाद्या व्यक्तीने वर्षाला ५० लाख रुपये मिळवले, तरी ५० लाख ही त्याची निदान आत्ताची तरी एक सीमा आहे. असे असल्यामुळे, आहे त्या उत्पन्नात खर्च भागवणे गरजेचे असते. अंथरूण पाहून पाय पसरणे ही म्हण आपण जाणतो, ती खरोखर आजच्या काळातही महत्त्वाची आहे. सहज मिळत असलेल्या क्रेडिट कार्ड सुविधेने त्याचा फायदा न होता तोटा होतानाही आपण पाहतो. क्रेडिट कार्डवर केलेल्या खरेदीचे पैसे वेळेत न भरल्यास त्याचे खूप जास्तीचे व्याज भरावे लागते. एकदा त्या विळख्यात अडकलो, तर बाहेर येणे खूप कठीण.

खर्च कमी करण्यासाठी खालील एक किंवा जमल्यास सर्व गोष्टींचा अवलंब केल्यास, नक्की बचत करणे आणखी सोपे होईल.

१. महिन्याचा हिशेब लिहिणे : हिशेब लिहिल्यामुळे महिन्याचा खर्च नक्की किती आहे, हे लक्षात येते. शिवाय हिशेब नियमितपणे लिहिल्याने एखादा महिना जास्त खर्च झाल्यास लक्षात येते. तो कशामुळे किंवा कोठे झाला, हेही कळते.

२. खर्चासाठी वेगळे बचत खाते : या खात्यात महिन्याच्या खर्चा एवढेच पैसे ठेवावे. एकाच खात्यातून जर खर्च केला, तर तो किती होतो आहे हे लक्षात येते. शिवाय त्या खात्यातील पैसे संपत आल्यास लगेच लक्षात येते, की आपली महिन्याची खर्चाची मर्यादा ओलांडली जात आहे. म्हणजेच पुढील खर्च टाळणे हा इशारा आपल्याला मिळतो. याने महिन्याचा खर्च आवाक्यात राहण्यास निश्चित मदत होते.

३. प्राधान्यक्रम नीट असणे : सध्या मध्यमवर्गीय कुटुंबाचे महिन्याचे पैशांचे गणित जर पहिले, तर ते थोडे फार अशा प्रकारचे असते.

  • मासिक उत्पन्न : रुपये एक लाख
  • कर्जाचा हप्ता : रुपये पन्नास ते साठ हजार
  • मासिक खर्च : रुपये तीस ते चाळीस हजार
  • गुंतवणूक : रुपये पाच ते दहा हजार

वरील उदाहरणात दिल्याप्रमाणे प्राधान्यक्रमही असाच असतो. उत्पन्नातून आधी हप्ते भरणे, खर्च करणे व पैसे उरले तर गुंतवणूक करणे, असा प्राधान्यक्रम मध्यमवर्गीय कुटुंबात दिसून येतो. कुटुंबाचे उत्पन्न किती आहे, त्याहीपेक्षा त्याचा प्राधान्यक्रम कसा आहे, गुंतवणूक किती आहे, कुठे केली जात आहे, यावर संपत्ती निर्माण होणार किंवा नाही, याचे उत्तर सापडते. आपण अजून एक उदहरण पाहू,

  • मासिक उत्पन्न : रुपये एक लाख
  • गुंतवणूक : रुपये तीस ते चाळीस हजार
  • कर्जाचा हफ्ता : रुपये तीस ते चाळीस हजार
  • मासिक खर्च : रुपये तीस ते चाळीस हजार

वरील उदाहरणात आपल्याला दिसून येईल, की प्राधान्यक्रम निश्चितपणे वेगळा आहे. प्रथम प्राधान्य हे गुंतवणुकीला आहे, मग बाकीच्या गोष्टींना. हे असे केल्याने काही फायदे होतात. ते असे, की एक तर गुंतवणूक नक्की होते. त्यात कुठे व्यत्यय येत नाही. दुसरे गुंतवणूक करून मग खर्च केल्याने आपोआप खर्च आटोक्यात येतात. ज्या लोकांना असे वाटते, की त्यांचे उत्पन्न खूप कमी आहे किंवा त्यांना पैसे वाचवणे व गुंतवणे शक्य नाही, त्यांनी आपला प्राधान्यक्रम वरील प्रमाणे बदलून त्याचे फायदे अनुभवावेत. एकदा फायदा होत असल्याचे काही महिन्यांनी लक्षात आले, की आपोआप हा प्राधान्यक्रम पाळण्याकडे तुमचा कल असेल. शिवाय काही महिन्यांनी त्याची सवय होऊन तो नेटाने चालू ठेवणे शक्य होईल.

४. खर्च करण्याचा मोह टाळणे : खर्च करण्याचा मोह होणे हे स्वाभाविकच असते. त्यातून जर स्वतःला वाचवायचे असेल, तर पुढील गोष्ट करा. एखादी गोष्ट घेण्याचा विचार आल्यास सर्वप्रथम त्याची खरेच आपल्याला, आपल्या मुलांना गरज आहे का हे बघावे. उगीच मुले मागतात म्हणून किंवा शेजारच्यांनी घेतले म्हणून तुम्ही वस्तू घेणे ही खूप मोठी चूक ठरेल. त्यापुढे जाऊन जर मोह नाही आवरता आला, तर त्यासाठी पैसे दर महिन्याला वाचवून मग घेण्याचा निश्चय करा. शिवाय तीच गोष्ट घ्यावीशी वाटल्यास दर वेळी स्वतःला समजावा, की ती वस्तू मला फार उपयोगाची नाही. असे तीन ते चार वेळा केल्यास आपोआप ती वस्तू घेण्याचा तुमच्या मनातील मोह कमी झालेला अनुभव येईल.

५. सवलतीच्या दरातील विक्री : काही वेळेस सेल आहे म्हणून आपण खरेदी करतो, मग पैसे वाचतात या विचारांनी काही उपयोगी नसलेल्या वस्तूही घेतो किंवा गरजेपेक्षा जास्त घेतो. सेलमध्ये खरेदी करण्याआधी हे लक्षात घ्यावे, की अगदी ३० टक्के सवलत असली, तरी आपण खरेदी न करून १०० टक्के सवलत मिळवून पूर्ण पैसे वाचवू शकतो.

आपण वर दिलेला प्राधान्यक्रम पहिला, तो व्यवस्थित पाळला, तर बाकीच्या गोष्टी अगदी सोप्या होतील. प्राधान्यक्रम योग्य असल्यास आपोआप खर्चाला लगाम बसेल. पैसे बाजूला बचत आणि त्या अनुषंगाने गुंतवणुकीला सुरुवात होऊ शकेल. वर सांगितलेले हे सर्व उपाय केल्यास खर्चाशी निगडीत बऱ्याच समस्या आटोक्यात येतील. हे उपाय करून तुमचा अनुभव आम्हाला नक्की कळवा. वरील सर्व उपाय केले, तर निश्चित खर्चावर नियंत्रण राहून भविष्यासाठी तरतूद करता येईल.

G 50 , Ecstasy Business Park,
near City Of Joy, JSD Road,
Mulund West, Mumbai-400080